हॉटेलला ऑनलाईन रेटिंग देणे पडले महागात; तरुण अभियंत्याला दोन लाख ६५ हजारांचा गंडा
सातारा : हॉटेलची प्रसिद्धी होण्यासाठी त्यांची ऑनलाइन लिंक पाठविली जाईल. तुम्ही फक्त तिला रेटिंग द्यायचे आहे, त्या बदल्यात तुम्हाला कमिशन दिले जाईल, असे आमिष दाखवून, सुरुवातील काही पैसे देऊन. या टास्कमध्ये अधिक पैसे गुंतविले, तर त्याचा चांगला परतावाही मिळेल, असे सांगून पैसे भरण्यास भाग पाडून तरुणाची तब्बल दोन लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील एका बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअरला अनोळखी व्यक्तीशी मोबाइलवर चॅटिंग करणे महागात पडले आहे. उच्चशिक्षित मुलेही सायबर चोरट्यांच्या गळाला लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यात राहणाऱ्या २८ वर्षीय बीई मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाला त्याच्या टेलीग्रामवर चार दिवसांपूर्वी एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये हॉटेलला रेटिंग दिल्यास काही पैसे मिळतील, असे सांगितले. त्या अभियंता तरुणाने चॅटिंग करण्यास सुरुवात केली. अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर वेगवेगळे टास्क करायला सांगितले. तो जसे सांगत गेला, तसे अभियंता तरुण ऐकत गेला. १८० रुपये अभियंता तरुणाच्या अकाउंटमध्ये पाठवून अनोळखी व्यक्तीने त्याचा विश्वास संपादन केला.
मात्र, रेटिंग देताना काही चुका झाल्या आहेत, तुम्हाला आणखी पैसे द्यावे लागतील, असे सांगून संबंधित व्यक्तीने दहा-पाच हजार नव्हे तर तब्बल दोन लाख ६५ हजार रुपये उकळले. तेव्हा संबंधित अभियंता तरुण खडबडून जागा झाला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. आपली चूक लक्षात येताच त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.





