नजर हटी, दुर्घटना घटी! पिकअप मधून १ लाख ३८ हजारांची रोकड लंपास: खेड शिवापूर टोलनाक्या जवळील घटना
खेड शिवापूर : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एक चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत एका पिकअप जीप मधून तब्बल १ लाख ३८ हजार ४० रुपयांची रोकड लंपास केली आहे. सदर घटनेबाबत राजगड पोलीस ठाण्यात अभिजीत गजानन माळी(वय २५ वर्षे, रा. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी तक्रार दाखल केली आहे.
राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ मंगळवारी(दि. १२ मार्च) रात्री १२ च्या दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर हॉटेल गारवाच्या अलीकडे रस्त्याच्या बाजूला हा प्रकार घडला. अभिजीत माळी यांच्या पिकअप(एम एच ०७ पी ०६३६) मधून ही चोरी झाली आहे. माळी यांचा शेतीमाल वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. माळी हे नेहमी प्रमाणे गावातील शेतकऱ्यांचा द्राक्षाचा माल गोळा करून वाशी मार्केट ला विकून मिळणाऱ्या १ लाख ३८ हजार ४० रुपयांची रोख रक्कम घेऊन सावळज(ता. तासगाव) गावी निघाले होते. मात्र पैसे घरी घेऊन जाण्याआधी रस्त्यातच चोरट्यांनी ते लंपास केले. माळी यांनी त्यांची सर्व रोकड पीकअप मध्ये सिटाचे खाली असणा-या लाकडी कप्यात ठेवली होती. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ चहा पिण्यासाठी माळी खाली उतरले होते. काही वेळाने ते पिकअप जवळ पोहचले. त्यांनी पाहिले की, गाडीतून रोकड चोरीला गेली आहे. थोड्यावेळासाठी बाहेर गेल्याने आपले एवढे नुकसान होईल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांनी लगेच राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर घटनेबाबत पुढील तपास पोलीस अंमलदार कोल्हे करीत आहेत.





