शिवरे रिंगरोड प्रकरण | शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रिंगरोड जमिनीची मोजणी तूर्तास रद्द; शेतकऱ्यांच्या हरकती जाणून घेतल्या नंतर कार्यवाही होणार
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे(ता.भोर) गावातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी जमिनीची मोजणी आज गुरूवारी(दि. १३ जून) होऊन भूसंपादन होणार होते. शिवरे ग्रामस्थांनी या रिंगरोड बाबत विविध प्रकारची आंदोलने करत वारंवार विरोध दर्शवला होता. त्यांनतर रिंगरोडसाठी बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या जमिनीची मोजणी करण्याबाबत तारीख शासनाकडून ठरवल्यात आल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी व कृती समितीने मंगळवारी(दि. ११ जून) तातडीची बैठक घेऊन जमीन मोजणीला विरोध दर्शविला होता. यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहता एमएसआरडीच्या अधिकाऱ्यां कडून शिवरेतील जमिन मोजणीची कार्यवाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. परंतु या पार्श्वभूमीवर गावातील शेतकऱ्यांच्या नव्याने हरकती जाणून घेणार असून जमीन मोजणीला रिंगरोड प्रशासनाने सध्या तरी स्थगिती दिली असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान रिंगरोड साठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून जमिनी मोजणीच्या नोटीसा शेतकऱ्यांनी बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्या नोटीसा शेतकऱ्यांनी स्वीकारल्या नव्हत्या. यानंतर गुरुवारी भूसंपादन होणार होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊन देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. तूर्तास भूसंपादनासाठी जमिनीच्या मोजण्या थांबवण्यात आले असून शेतकऱ्यांच्या नव्याने हरकती जाणून घेणार आहोत त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र रस्ते व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.





