तात्या, आता माघार नाही! कार्यकर्त्यांनी ठोकला शड्डू: अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे उद्या करणार प्रचाराचा शुभारंभ; भोर मध्ये विराट सभेचे आयोजन
भोर : गेली २ विधानसभा आपले मताधिक्य दाखवत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना चुरशीची लढत देणारे माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांना महायुतीने चालू विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारी नाकारली. या पार्श्वभूमीवर कुलदीप कोंडे यांनी नाराजी व्यक्त करत दि. २९ ऑक्टोबर रोजी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कुलदीप कोंडे समर्थकांनी भोर शहरात विराट शक्तिप्रदर्शन करत एल्गार केला. आज सोमवार (दि. ४ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. परंतु देव जरी आला तरी अपक्ष उमेदवारी माघार घेणार नसून विधानसभा निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याचे कुलदीप कोंडे युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या दरम्यान उद्या मंगळवारी(दि. ५ नोव्हेंबर) अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानात दुपारी ३ वाजता या भव्य विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची माहिती देण्यासाठी भोर विधानसभेत युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून गावागावात वाड्या-वस्त्यांवर घोंगडी बैठका घेण्यात येत आहेत. या सभेसाठी तब्बल १५ ते २० हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोर-राजगड-मुळशीतील कुलदीप कोंडे यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या समर्थकांनी मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कुलदीप कोंडे युवा मंचचे पदाधिकारी विकास बाप्पू चव्हाण यांनी केले आहे.





