भोर तालुक्याच्या हिरडस मावळातील निसर्ग संपन्नता धोक्यात: हजारो ब्रास मातीची अवैध वाहतूक सुसाट; तलाठी, मंडलाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, भाग-१
मुख्य संपादक : दिपक महांगरे
भोर : तालुक्याच्या हिरडस मावळ भागातील गावांमधून दररोज शेकडो डंपर मातीची अवैध वाहतूक सुरू आहे. या भागातील तलाठी व मंडलाधिकारी हे या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा स्थानिकांकडून होत आहे. हिरडस मावळातील साळव, कारी, आंगसुळे येथून दररोज शेकडो ट्रक माती जात आहे. प्रथम ही वाहतूक फक्त रात्री व्हायची. मात्र, मातीला असलेल्या मागणीमुळे आता ही वाहतूक दिवसाही जोरात सुरू आहे.
अवैध माती वाहतुकीकडे तलाठी, मंडलाधिकारी आणि पोलिसांची डोळे झाक
आपले राजकीय किंवा गुन्हेगारी वजन वापरून डोंगर कोठेही उकरून फुकट मिळणाऱ्या मातीपासून काही जण दररोज लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. त्यांची पार्श्वभूमी बघून स्थानिक नागरिक याला विरोध करू शकत नाहीत. तसेच या परीसरात होणाऱ्या अवैध माती वाहतुकीकडे तलाठी, मंडलाधिकारी आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या डोळे झाक करण्यामागे लक्ष्मी दर्शन तर नाही ना असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नष्ट होताहेत डोंगर
अधाशासारख्या वृत्तीने मती माफियांनी हिरडस मावळातील डोंगर पोखरण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे डोंगरांची नैसर्गिक रचना नष्ट झाली असून मोठमोठे खड्डे आणि खदानीसारखा भाग तयार झाला आहे.
मोठ्या डंपरमुळे रस्त्याची दुरावस्था, स्थानिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
या माती वाहतुकीसाठी काही शेतकऱ्यांना हाताशी धरून अल्प मोबदल्यात काही ब्रास मातीची रॉयल्टी काढली जात आहे. मात्र प्रत्यक्षात प्रमाणाबाहेर माती उपसली जात असून त्याची राजरोजपणे वाहतूक केली जात आहे. सहा ते सात ब्रास माती एकाच वेळी वाहतूक करणाऱ्या मोठ्या डंपरमुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. तसेच सुसाट वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांमुळे स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रोज प्रवास करावा लागत आहे.
ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असणाऱ्या हिरडस मावळ भागातील अवैध माती वाहतूक थांबवून अशा माती माफियांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी. तसे न झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने येत्या काही दिवसांत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
– अजय कांबळे, उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका.