महामार्ग होणार सोमवारपासून मोकळे; अतिक्रमण हटविण्यासाठी प्राधिकरणाकडून ३० दिवसांचे कारवाईचे वेळापत्रक जाहीर

पुणे : पुणे शहराभोवती असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे वेळापत्रक पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाकडून तयार करण्यात आले आहे.

त्यानुसार सर्व विभागांशी समन्वय साधून पुढील तीस दिवसांत ही कारवाई सुरू ठेवून महामार्ग मोकळे करण्यात येणार आहेत. त्यांची सुरुवात तीन मार्चपासून करण्यात येणार आहे. पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

त्यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गावर होणारी वाहतूक कोंडीबाबत विविध विभागांनी बैठकीत मते नोंदविली.

त्यानुसार या महामार्गांवर वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागांत पुढील ३० दिवसांत राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेली दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. यापुढील काळात वर्षातून दोन वेळा अशा प्रकाराच्या कारवाईचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत, असे आवाहन डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

Advertisement

या बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी-पाटील, अधीक्षक भूमी अभिलेखाच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतूक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, पुणे शहर सहाय्यक पोलिस आयुक्त नंदिनी वग्याणी, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शंकर पाटील, मीनल पाटील, संतोष जाधव, बी. के. गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे सह शहर अभियंता हरियाल नरेश, एमआयडीसीचे उपअभियंता प्रकाश पवार, पुणे मनपाचे उप अभियंता महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्पेश लहिवाल, एमआयडीसीचे एम. एस. भिंगारदिवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अशी होणार कारवाई

 ३ ते १० मार्च

– पुणे-सोलापूर महामार्ग (हडपसर ते यवत व उरुळी कांचन ते शिंदवणे)

– पुणे-नाशिक महामार्ग (राजगुरुनगर),

– चांदणी चौक ते पौड

 १० ते २० मार्च

– पुणे-सातारा महामार्ग

– (नवले पूल ते सारोळे)

– सूस मार्ग

– हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट

– नवलाख उंब्रे ते चाकण

– हिंजवडी परिसर-माण

– तळेगाव-चाकण-शिक्रापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page