डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पुणे शहर आणि जिल्ह्यात महास्वच्छता अभियान मोहीम.
पुणे : रेवदंडा (ता. अलिबाग जि. रायगड) येथील डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज रविवार (दि.०२ मार्च) रोजी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री डॉ. श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुणे शहरामध्ये एकूण ५७३५ श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये ५२८.८७ टन कचरा गोळा करण्यात आला. केळेवाडी येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या स्वच्छता अभियानास भेट दिली.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता अभियानातून जो परिसर स्वच्छ केला आहे, त्या परिसरात यापुढे कायमस्वरूपी स्वच्छता राहिली पाहिजे, तसेच यापुढे या परिसरात कचरा दिसता कामा नये. असे तोंडी आदेश पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमदार भीमराव तापकीर यांनी वारजे माळवाडी येथे यावेळी दिले. प्रतिष्ठानचे कार्य हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
सुतारदरा येथे खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा स्वच्छता अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवत स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन स्वच्छता केली. यावेळी वारजे माळवाडी येथे नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या स्वच्छता अभियानामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या श्री सदस्यांसह इतर नागरिक पण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दीपक राऊत, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, दिपाली धुमाळ, सायली वांजळे, भारत भूषण बराटे, सुनील बनकर, संजय हरपळे आणि विविध राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुणे शहरातील कोथरूड – सुतारदरा, किष्किंधा नगर, म्हतोबा नगर, केळेवाडी, बावधन पाण्याची टाकी परिसर, बारटक्केहॉस्पिटल-वारजे, शिवणे, शिंदेपूल व मोरे पेट्रोल पंप, आंबेगाव नऱ्हे, ग्लायडिंग सेंटर हडपसर, स्वारगेट पोलिस लाईन, फोरेक्स पार्क – विमानतळ रोड, तळजाई पठार, तुकाराम नगर सन ब्राईट स्कूल परिसर तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संकलित करण्यात आलेला कचरा पुढे महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रावर महानगरपालिकेच्या तसेच प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांमधून पाठविण्यात आला आहे.