महिला दिनानिमित्त न्हावीतील शाळेत प्रतिकूल परिस्थितीतून अधिकारी झालेल्या मुलांच्या कर्तृत्ववान मातांचा सन्मान
सारोळा : जागतिक महिला दिनानिमित्त जि. प. प्रा. शाळा न्हावी (ता. भोर) येथे दि. ८ मार्च रोजी आदर्श कर्तृत्ववान महिला माता सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रतिकूल परिस्थितीतून शासकीय सेवेत गेलेल्या अधिकारी मुलांच्या मातांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये कुसुम विलास सोनवणे, छबुबाई गणपत भोसले, मालन सुरेश हराळे, सुनंदा सदाशिव सोनवणे, शोभा धनंजय सोनवणे यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राज्य समन्वयक – महाराष्ट्र व मध्यप्रदेश, व्हिडीओ व्हालिटीयर्स इंटरनँशनल संस्थेच्या सामुदायिक संवाददाता, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणीताई पवार यांचे “महिला सुरक्षा व आरोग्य” या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत न्हावी ३२२ च्या सरपंच शीतलताई सोनवणे, प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत न्हावी १५ च्या उपसरपंच सीमाताई जगताप उपस्थित होत्या.
उपस्थित आदर्श मातांनी आपले मनोगतांतून आपल्या मुलांच्या अधिकारी पदापर्यंतचा प्रवास उलगडला. यावेळी विमल भूतकर, प्रतिभा सोनवणे, प्रसिद्ध क्रिमिनल वकील पुणे सत्र न्यायालय अमरसिंह सोनवणे, जलसंपदा अधिकारी पुणे यांनी प्रेरणादायी मनोगतातून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र न्हावी 15 यांच्या वतीने रेश्मा शिवणकर व अश्विनी देवडे यांनी उपस्थित महिलांना कॅन्सर व आरोग्यविषयक माहिती दिली. कार्यक्रमासाठी महिला, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी इयत्ता २ रीच्या विध्यार्थ्यानी ‘मुलींचा प्रवास’ या नृत्यगीतावर सादरीकरण केले व उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. इयत्ता ४ थीच्या विध्यार्थिनींनी कर्तृत्ववानं महिलांची वेशभूषेतून पात्र साकारली.
कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत न्हावी ३२२ चे ग्रामविकास अधिकारी विजय कुलकर्णी यांचेवतीने दिलेल्या गोड जेवणाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली बोन्द्रे, सूत्रसंचालन रुपाली पिसाळ यांनी केले. तर आभार पूनम सोनवणे यांनी मानले. संदीप मोरे, अनिल चाचर, उर्मिला भूतकर, गीतांजली पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.