गॅस टँकर मधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग, राजगड पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या; पुणे-सातारा महामार्गावरील कामथडी गावच्या हद्दीतील घटना
नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील कामथडी गावच्या हद्दीत घरगुती वापरातील गॅस वाहतुक करणाऱ्या टँकरमधुन चालकाच्या संगनमताने यंत्राच्या सहाय्याने व्यावसाईक सिलेंडर भरणाऱ्या तिघांना राजगड पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याकडून २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सारंग पोपट भोसले (वय २२ वर्ष, रा. आंबेगाव कात्रज, पुणे), धनंजय विठ्ठल कुलके (वय ३० वर्ष, रा. आंबेगाव कात्रज, मुळगाव महुद ता.सांगोला जि.सोलापुर) व निवृत्ती अशोक टोणे (वय २९ वर्ष रा. खोपडेनगर, कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून गॅस टँन्कर चालक मात्र अद्याप फरार आहे. राजगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी विकास साळुंखे (वय ३० वर्ष) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड पोलीस ठाण्यातील कर्मचारी दि. १४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी कामथडी (ता.भोर) गावच्या हद्दीतील अनुप पेट्रोल पंपा शेजारील मोकळ्या जागेत फरार गॅस टँकर चालकाच्या संगनमताने वरील तिनही आरोपींनी टँन्कर मधील गॅस यंत्राच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या भारत गॅस कंपनीच्या सहा तसेच एच पी कंपनीच्या आठ व्यवसाईक सिलेंडर मध्ये भरुन ते सिलेंडर त्यांच्या ताब्यातील टेम्पो क्र. एम. एच. ०१ सी. आर. ८५७७ मधुन वाहतुक करत असताना अढळुन आले.
पोलीसांची कुणकुण लागताच हे आरोपी टेम्पो सोडुन पळुन गेले. या दरम्यान बेकायदेशीर सिलेंडर भरुन झाल्यावर गॅस टँन्कर चालक देखिल टँकर घेऊन निघुन गेला होता. पोलिसांनी गॅस भरलेले १४ सिलिंडर व टेम्पो ताब्यात घेतला. त्यांनतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना सोमवार (दि. १७ मार्च) रोजी अटक केली असुन अटक केलेल्या तीनही आरोपींना मंगळवार (दि. १८ मार्च) रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटनेबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील व सहकारी करत आहेत.





