राजगड तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना १३ घरकुले मंजूर झाली; पण जागा कुठेय? मग एका पठ्ठ्याने स्वखर्चातून ११ गुंठे जागा विकत घेऊन दिली, सर्वत्र होतेय कौतुक

राजगड : राजगड(वेल्हा) तालुक्यातील कादवे येथील १३ आदिवासी कुटुंबांना मंजूर झालेले घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्याने येथील नितीन राजेंद्र राऊत यांनी स्वतःच्या पैशातून ११ गुंठे जागा या कुटुंबांना विकत घेऊन दिली. या समजाभिमुख कार्याबद्दल भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार निवास ढाणे व गटविकास अधिकारी पंकज शेळके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड(वेल्हा) तालुक्यातील कादवे येथील १३ आदिवासी कुटुंबांना गेली अनेक वर्षे घरकुल योजने अंतर्गत घरे मंजूर झाली होती. परंतु घरकुल बांधण्यासाठी या कुटुंबांना जागा उपलब्ध होत नव्हती. पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाहासाठी भटकंती करून जीवन जगत असलेल्या आदिवासी कुटुंबांना हक्काचा पक्का निवारा मिळत नव्हता. 

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून ही कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित आहेत ही बाब लक्षात येताच नितीन राजेंद्र राऊत यांनी कादवे येथील गट नंबर ७१४ मधून ११ आर जागा ही आदिवासी कुटुंबातील व्यक्तींना घरकुले बांधण्यासाठी स्वतःच्या पैशातून विकत घेतली. नितीन राऊत यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. आदिवासी कुटुंबियांच्या जीवनात परिवर्तन करून खरा विकास साध्य होण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आदिवासी कुटुंबातील घरकुलांचा प्रश्न यामुळे मार्गी लागला आहे. त्याबद्दल भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार निवास ढाणे व गटविकास अधिकारी पंकज शेळके यांच्या हस्ते नितीन राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पासलकर, राहुल ठाकर, लक्ष्मण ढेबे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page