पुरंदर विमानतळ ड्रोन सर्व्हेला आक्रमक शेतकर्‍यांमुळे ब्रेक; आंदोलन पेटले, विरोध कायम

सासवड : पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित गावामध्ये प्रशासनाने जबरदस्तीने ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकर्‍यांनी त्यास कडाडून विरोध केला. आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी सर्व्हे करणारा ड्रोन फोडून टाकला.

त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने सर्व्हे रद्द करणार असल्याचे सांगितले. मात्र, लेखी हमी दिल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. शेतकर्‍यांचा विरोध झुगारून सर्व्हे करण्याच्या प्रयत्न करणार्‍या प्रशासनाला भर उन्हात दिवसभर रस्त्यावरच अडवून ठेवले. संपूर्ण रस्तावर चक्काजाम करून वाहतूक बंद केली.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी अशा सात गावांत विमानतळ प्रकल्प करण्यात येणार असून यासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र प्रकल्पाला सातही गावांतील शेतकर्‍यांनी सुरुवातीपासून कडाडून विरोध केला आहे. तब्बल आठ वर्षे विरोध करण्यात येत असून मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकरी मोर्चा घेवून गेले होते. शासनाने शेतकर्‍यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेता प्रकल्प बाधित असलेल्या एखतपूर गावातील जमिनीचा ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 2 मे) भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी असे सर्वजण महसूल अधिकारी तसेच पोलीस फौजफाटा घेवून सर्व्हे करण्यासाठी एखतपूर गावात सकाळी ११ च्या दरम्यान पोहोचले. याची शेतकर्‍यांना माहिती मिळताच प्रकल्पबाधित असलेल्या एखतपूरसह वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी गावातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने जमून अधिकार्‍यांचा जोरदार निषेध केला.

शेतकरी आणि पोलिसांत तणाव वाढला

प्रशासनाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे लोकांचा जमाव जमला असतानाच एका बाजूने ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. याची कुणकुण लागताच काही शेतकर्‍यांनी संबंधित ड्रोन पळवून नेत फोडून टाकला, त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांत चांगलाच तणाव वाढला. पोलिसांनी आवाज वाढवताच शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. सर्व शेतकर्‍यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. तसेच ज्या गाडीत ड्रोन मशीन ठेवले होते, त्या गाडीलाच महिला शेतकर्‍यांनी संपूर्ण वेढा घातला. पोलिसांनी वारंवार विनंती आणि धमकी देण्याचा प्रयत्न करूनही महिलांनी आक्रमक होत रस्त्यावरच ठाण मांडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक होत होती. अनेकवेळा पोलिसांनी महिलांना धमक्या देवून सर्व्हे करण्याचा तसेच रस्त्यावारुटन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकर्‍यांनी कोणतीही दाद दिली नाही.

Advertisement

सायंकाळी सहा वाजता दंगा काबू पथक पाचाराण

अखेर पोलिसांनी कोणताही ड्रोन सर्व्हे करणार नाही असे प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले. त्यावर तुम्ही लेखी हमी दिल्यास आंदोलन थांबवितो असे सांगितले. मात्र अधिकारी लेखी हमी देत नसल्याने शेतकर्‍यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सायंकाळी पाच वाजता पुन्हा जादा महिला पोलीस कर्मचार्‍यांची कुमक बोलाविण्यात आली. मात्र तरीही शेतकरी आक्रमक होत असल्याने सायंकाळी सहा वाजता दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले.

शेतकर्‍यांनी सर्व्हेला सहकार्य करावे, हे शासनाचे काम आहे, सर्व्हे कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नाही. आम्हाला शेतकर्‍यांवर कोणत्याही परिस्थितीत लाठी हल्ला अथवा जबरदस्ती करायची नाही. तुम्ही कितीही विरोध केला तरी आज कमी पोलीस आहेत पुढच्या वेळी आणखी जास्त प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात येवून सर्व्हे करावा लागेल. मात्र सर्व्हे होणारच.

         – तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सासवड.

 

उर्वरित गावातील शेतकरी धास्तावल

प्रचंड विरोध करूनही प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून एखतपूर गावचा ड्रोन सर्व्हे पूर्ण केला. मात्र यामुळे उर्वरित वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण गावातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. विशेष म्हणजे ज्या गाव पुढार्‍यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या, मोठमोठी भाषणे केली त्यातील एकही गावचे पुढारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. तर केवळ महिला शेतकर्‍यांना पुढे करूनच आंदोलन दिवसभर सुरू होते, त्यामुळे शेतकर्‍यांनी गाव पुढार्‍यांचा सोशेल मीडियाच्या माध्यमातून जोरदार समाचार घेतला. फोटो काढायला, बातम्यात नावे द्यायला हेच पुढारी, मात्र प्रत्यक्ष गुन्हे दाखल होताना महिलांना पुढे करतात अशा शेलक्या शब्दात पुढार्‍यांचा निषेध केला आहे. उर्वरित गावच्या आंदोलनात गावचे पुढारी, गाव कारभारी उपस्थित राहणार का ? असे प्रश्नही उपस्थित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page