भोर-महाड रस्त्याचे काम संथगतीने! अर्धवट कामाचा प्रवाशांना त्रास, अपघाताचे प्रमाण वाढले; प्रशासनाचे दुर्लक्ष
भोर : भोर-महाड रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट कामामुळे प्रवाशांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, घाटातील काम वेळेत पूर्ण न झाल्यावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता वाहतुकीअभावी बंद राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. निगुडघर – देवघर – वारवंड (ता. भोर) या गावापर्यंत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. मात्र हे काम मंदगतीने होत असून पुलाच्या ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.
धुळीमुळे प्रवाशांचा श्वास कोंडला जातोय
झालेल्या कामावर ठेकेदाराकडून वेळेत पाणी मारले जात नसल्यामुळे मुरुमांची माती होऊन रस्त्यावर धूळ पसरत असल्यामुळे वाहने लाल मातीने खराब होत आहेत. रस्त्यावर खाचखळगे पडल्याने रस्ता सुस्थितीत नाही. फुफाटा व धुळीमुळे वाहनचालक, प्रवाशांचा श्वास कोंडला जात आहे. वाहने चालवताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे, याकडे ठेकेदार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले
हिर्डोशी हद्दीतील राऊतमाळ मोरीजवळ पूर्ण रस्ता खोदून ठेवला असून, हा रस्ता मातीचा आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोणत्याही उपाययोजना येथे केल्या नाहीत. येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा धुराळा साचला आहे. धुराळ्यामुळे रस्त्यावर पडलेले खाचखळगे दिसून येत नाहीत. वाहनांच्या चाकाचे टायर मातीच्या फुफाट्यात गाडले जात आहेत. दुचाकीस्वाराला या मातीच्या अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत आहे. त्यामुळे निदान या रस्त्याचे काम एका बाजूने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
ठेकेदारने सुरुवातीला वेणुपुरी येथून कामाला सुरुवात केली होती, परंतु ते काम अपूर्ण असतानाच देवघर ते वेणुपुरीदरम्यान जागोजागी रस्ता खोदून मोर्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. कोंढरी, वेणुपुरी तसेच हिर्डोशीतील टाकीचा माळ, सोमजाईचा माळ, हराळीचा माळ, मालुसरेवाडी येथील स्थानिक नागरिकांना पायी व दुचाकीवर हिर्डोशी आरोग्य केंद्रात उपचारासाठी यावे लागते. तसेच हिर्डोशीसह या मार्गावरील प्रवास करणार्यांना धुळीचा व खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.