नीरा देवघर प्रकल्पबाधितांसाठी निगुडघर येथे उद्या विशेष शिबिर; शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित राहण्याचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांचे आवाहन

भोर : तालुक्यातील नीरा देवघर धरण प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उद्या बुधवारी (दि. ७ मे) महसूल विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. निगुडघर (ता. भोर) येथे बुधवारी सकाळी दहा वाजता पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष शिबिर होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.

Advertisement

या शिबिरात नीरा देवघर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात येणार आहेत. यामध्ये नीरा देवघर धरणाच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळणे, भूखंड मिळणे, नागरी सुविधा देणे आदी प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नांबाबत चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या शिबिरात नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, भोरचे आणि वाई (जि. सातारा) विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक आदी उपस्थित राहणार आहेत.

नीरा देवघर प्रकल्पामधील बाधित असलेले साळव, दापकेघर, हिर्डोशी, वेणुपुरी, शिरवली, धामनोशी, पऱ्हर बुद्रुक, पऱ्हर खुर्द, देवघर, वारखंड, दुर्गाडी, अभेपुरी, शिरगाव, कोंढरी, माझेरी, कुडली बुद्रुक, कुडली खुर्द, गुढे व रायरी या गावातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी शिबिरात उपस्थित राहून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page