भोर तालुक्यात खळबळ! सरपंचाच्या पतीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला; निगडे गावात तणावाचं वातावरण
कापूरव्होळ : भोर तालुक्यातील निगडे गावच्या सरपंचाच्या पतीच्या कारवर भरदिवसा कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत विद्यमान सरपंच नाजूका बारणे यांचे पती किशोर लक्ष्मण बारणे (वय ४१ वर्ष, रा. निगडे, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर आनंदा चिकणे व त्यांचा मुलगा प्रथमेश ज्ञानेश्वर चिकणे (दोघेही रा. निगडे, ता. भोर) यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारणे हे स्वतःच्या कारने शनिवारी (दि. २ ऑगस्ट) दुपारी १ वाजता घरी जात असताना, हायवे ते गावातील मुख्य रस्त्याच्या दरम्यान शिवाजी चौधरी यांच्या घराजवळील ठिकाणी ज्ञानेश्वर चिकणे व त्यांचा मुलगा प्रथमेश चिकणे हे दुचाकीवरून आले. त्यांनी अचानक गाडी थांबवून काहीही कारण नसताना बारणे यांच्या कारवर हातातील लोखंडी कोयत्याने जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यामुळे गाडीचे नुकसान झाले असून, बारणे यांनी त्यास जाब विचारताच वडील–मुलाने मिळून त्यांना अश्लील शिवीगाळ, दमदाटी केली. एवढ्यावरच न थांबता ज्ञानेश्वर चिकणे याने कोयता त्यांच्या दिशेने फेकून मारला. सुदैवाने कोयता त्यांच्या अंगावर न लागताच जमिनीवर पडला, अन्यथा जीवितहानी झाली असती, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकारानंतर किशोर बारणे यांनी तत्काळ कारमधून घर गाठले आणि राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नाना मदने करत आहेत.





