मनोज जरांगे-पाटील उद्या भोरमध्ये; रायरेश्वरला अभिषेकानंतर मराठा बांधवांशी करणार निर्णायक संवाद
भोर : मराठा आरक्षण चळवळीचा निर्णायक टप्पा समीप आला असून, संघर्षाचा बिगुल पुन्हा एकदा वाजणार आहे. मराठा आरक्षणासाठीची अखेरची आणि अस्तित्वाची लढाई मुंबईत रंगणार असून, त्यासाठी मराठा समाजाने सज्ज राहावे, हा संदेश देण्यासाठी मराठा क्रांतीचे ध्वजवाहक संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील उद्या शनिवारी (दि. ९ऑगस्ट) भोर तालुक्यात येणार आहेत.
भोर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवक यांना त्यांनी उद्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. तसेच “राजकारण बाजूला ठेवून, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आरक्षणाच्या हक्कासाठी आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्र येण्याचे आवाहन” सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्ष संजय भेलके यांनी केले आहे.
सकाळी ८ वाजता मनोज जरांगे-पाटील यांचे भोर येथे आगमन होईल. त्यानंतर ९ वाजता रायरेश्वरकडे प्रस्थान करून, ऐतिहासिक शिवमंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ स्मरणात ठेवत अभिषेक व पूजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १ वाजता रायरेश्वर येथून भोरकडे प्रयाण होईल.
दुपारी ३ वाजता भोर येथील यशवंत लॉन्स येथे मराठा बांधवांशी संवाद साधण्यात येणार आहे. या संवादादरम्यान आंदोलनाची दिशा आणि पुढील पावले स्पष्ट केली जातील. सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासाठीच्या चळवळीबाबत महत्त्वाचे निवेदन करण्यात येईल. तसेच रात्री १० वाजेपर्यंत मराठा बांधवांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून भेटी गाठी घेण्यात येणार आहेत.





