राजगड टेक्निकल कॅम्पस चा पर्सिस्टंट फाऊंडेशन सोबत सामंज्यस्य करार

कापूरव्होळ : शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पर्सिस्टंट फाऊंडेशन व प्राइमसोल एज्यु कंपनी यांच्या माध्यमातून राजगड टेक्निकल कॅम्पस येथे असलेल्या राजगड ज्ञानपीठच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या धोरणात्मक भागीदारीद्वारे उद्योग-संरेखित प्रमाणपत्रे, प्रकल्पाधारित इंटर्नशिप, प्राध्यापक विकास कार्यक्रम अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणे आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे हा उद्देश आहे. करार स्वाक्षरी समारंभाला दोन्ही संस्थांचे प्रमुख, शैक्षणिक अधिकारी, प्लेसमेंट समन्वयक व प्राइमसोल नेतृत्व पथक उपस्थित होते.

या प्रसंगी पर्सिस्टंट फाउंडेशनच्या प्रमुख योगिता आपटे म्हणाल्या, “हा करार भविष्यातील अभियंत्यांना वास्तविक जगातील कौशल्ये, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि करिअर-केंद्रित अनुभव देण्यासाठी आमच्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. राजगड टेक्निकल कॅम्पससोबत आम्ही नावीन्य, अनुकूलता आणि आजीवन शिक्षणाची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करू.”

Advertisement

राजगड ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष मा. आ. संग्राम थोपटे म्हणाले, “आमचे विद्यार्थी उद्योगासाठी सज्ज राहावेत, हा आमचा प्रयत्न आहे. पर्सिस्टंट फाउंडेशनसोबतचा हा करार तांत्रिक कौशल्य वाढवून, नाविन्यास प्रोत्साहन देऊन आणि विद्यार्थ्यांना वास्तविक आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करेल.”

मानद सचिव स्वरुपा थोपटे यांनी सांगितले की, “ही भागीदारी प्राइमसोलच्या शैक्षणिक जाळ्याला बळकट करेल, जे केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम नसून आजच्या गतिमान नोकरी बाजारपेठेत व्यावहारिकदृष्ट्याही उपयुक्त ठरतील.”

उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे म्हणाले, “विद्यार्थ्यांना एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबरसुरक्षा, अक्षय ऊर्जा, डेटा सायन्स यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.”

यावेळी प्राइमसोल एज्यु कन्सल्टिंगचे संचालक व सह- संस्थापक सौरभ सिसोदिया यांनी या भागीदारीतील विविध उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रसंगी राजगड टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य खोपडे सर व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page