कात्रज बोगद्याजवळील थरारक खूनामागे दडलेला प्रेमकहाणीचा राग; राजगड पोलिसांनी १२ तासात केला उलगडा
खेड शिवापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी (ता. भोर) परिसरात जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरावर १९ ऑगस्ट रोजी सकाळी एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. राजगड पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनीही तपासाची जबाबदारी घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. चौकशीत मृताची ओळख सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, पुणे, मूळ सोलापूर) अशी पटली होती. त्याच्या नातेवाईकांनी एक दिवस आधीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.
सीसीटीव्ही, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खुनाचा उलगडा…
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फूटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने वेगाने तपास सुरू केला. तपासादम्यान डी. बी. पथकातील पो.शि. अक्षय नलावडे यांच्या समोर धक्कादायक माहिती आली की, एक अल्पवयीन बालक आणि त्याच्या साथीदारांनीच सौरभचा खून केला आहे. यांनतर पोलिसांनी सापळा रचून श्रीमंत अनिल गुन्जे (वय २१, रा. खंडोबा मंदीर जवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. ढोले वाडा, वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८ वर्षे, रा. गोकुळनगर कात्रज) तसेच दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या १२ तासात ताब्यात घेतले.
खुनामागचं धक्कादायक कारण…
सौरभ आठवले हा मांगडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीला बहिण मानून शाळेत आणणे- सोडणे करत असे. मात्र त्याच मुलीशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यां पैकी एका अल्पवयीन मुलाचे प्रेमसंबंध होते. हे प्रकरण सौरभने मुलीच्या कुटुंबीयांना सांगितल्याने त्याला वडिलांच्या घरी बोलवण्यात आले. त्यामुळे प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून त्याने मित्रांच्या मदतीने सौरभचा खून करण्याचा कट रचला. सौरभला बोलावून डोंगरात नेण्यात आले आणि कोयत्याने व इतर हत्यारांनी वार करून त्याचा खून करण्यात आला.
पोलिसांची कारवाई…
संशयित आरोपींकडून ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. काळ्या रंगाची मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली असून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. अटक संशयित आरोपींना भोर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील, उपनिरीक्षक वृषाली देसाई तसेच अंमलदार सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुन कोल्हे, अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अनिल मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भडाळे, मंगेश कुंभार यांच्या पथकाने केली.





