साळवडे गावची कन्या ऋषा तांबटची गगनभरारी! चीनमधील आशियाई कराटे स्पर्धेत रौप्य पदक
नसरापूर : खेळाच्या मैदानावर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण कोणतीही शिखरे गाठू शकतो, याचे जिवंत उदाहरण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील साळवडे गावची कन्या ऋषा तांबट हिने साकारले आहे. चीनमधील शॉगुन येथे नुकत्याच पार पडलेल्या २३ व्या आशियाई कॅडेट, ज्युनिअर आणि U-२१ कराटे स्पर्धेत ऋषाने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर रौप्य पदक पटकावत भोर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
५६ किलो वजन गटात खेळताना ऋषाने प्रारंभीच्या फेऱ्यांपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. तिच्या जिद्द, वेगवान हालचाली आणि नेमक्या तंत्रामुळे तिने उपांत्य फेरीपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना मोठा प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. अंतिम सामन्यात देखील ऋषाने अप्रतिम लढत देत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
या यशामुळे ऋषाने फक्त आपल्या कुटुंबियांचेच नव्हे तर गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्राचे मान उंचावले आहे. तिच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमींनी तसेच स्थानिक जनतेने कौतुकाचा वर्षाव केला आहे. ऋषाच्या या यशामागे तिच्या पालकांचे प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत महत्वाची ठरली आहे. गावकऱ्यांनी ‘साळवडेची लेक आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकली’ असा अभिमान व्यक्त केला आहे.
कराटेसारख्या कठीण खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक पटकावणे हे सोपे काम नसते. मात्र ऋषाने आपली जिद्द, शिस्त आणि निष्ठा यावर विश्वास ठेवून हा पराक्रम गाजवला. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.





