गणपतीपुळे दर्शनाआधीच मृत्यूचा घाला; वरंधा घाटातील खड्ड्याने घेतला एकाचा बळी
भोर : गणपतीपुळे दर्शनासाठी कोकणाकडे जाणाऱ्या वरंधा घाटातून प्रवास करताना भोर तालुक्यातील शिरगावजवळ सोमवारी (दि.२९) पहाटे भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात चारचाकी कार (एमएच १२ एचझेड ९२९९) कोसळली. या दुर्घटनेत राहुल विश्वास पानसरे (वय ४५, रा. घाटकोपर, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल देवराम मुटकुले (वय ३२, अहिल्यानगर, संगमनेर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती भोर पोलिसांनी दिली.
गणपतीपुळे दर्शनासाठी जात असताना रात्रीच्या धुक्यात आणि खोदलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहन थेट खड्ड्यात कोसळले. पावसाचे पाणी व दगड-गोट्यांनी भरलेल्या या खड्ड्यात वाहन आपटल्याने राहुल पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक अक्षय धुमाळ, भिमाजी पोळ, दत्तात्रय पोळ यांनी धाव घेत जखमींना मदत केली. तर भोर पोलिस निरीक्षक अण्णा पवार, हवालदार अक्षय साळुंके, गणेश लडकत, सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कार्यवाही केली. रस्त्याच्या निष्काळजी कामामुळे झालेल्या या अपघाताने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.





