राजगड-तोरणा परिसरात चौसिंगा हरणांचे आगमन; दुर्मीळ प्रजातीच्या दोन पाडसांना वनविभागाने दिले जीवदान
राजगड : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला राजगड-तोरणा परिसर समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो. मात्र, या परिसरात चौसिंगा हरणांचा अधिवास असल्याचे प्रथमच स्पष्ट झाले आहे. दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या या प्रजातीची दोन पाडसे स्थानिक गोठ्यात शिरल्याची घटना समोर आली असून, वनविभागाने तातडीने कारवाई करत त्यांना जीवदान दिले.
शनिवारी (दि. २७) संध्याकाळी वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथे कैलास बोराणे यांच्या गोठ्यात गायी-वासरांमध्ये दोन पाडसे दिसून आली. स्थानिक नागरिकांनी आई हरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती सापडली नाही. अंदाजे दीड ते दोन महिन्यांची ही पाडसे पावसामुळे व थंडीत गारठलेली होती.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे व वनरक्षक भाग्यश्री जगताप यांनी तातडीने पाडसांना सुरक्षित केले. त्यांची प्राथमिक देखभाल करून रात्री उशिरा बावधन येथील प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.
लांडगे यांनी सांगितले की, “राजगड, तोरणा, पानशेत आणि रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर चौसिंगा हरिणे आढळण्याच्या घटना अत्यंत दुर्मीळ आहेत. या दोन पाडसांच्या आढळण्याने या भागात चौसिंगा हरिणांचे अस्तित्व निश्चित झाले आहे. लवकरच या प्रजातीसह इतर वन्यजीवांचा अधिवास संरक्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.”
या घटनेमुळे राजगड-तोरणा परिसरातील जैवविविधतेला नवे महत्त्व लाभले असून, वनविभाग आता चौसिंगा हरिणांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणार असल्याचे वनविभागाने सांगितले.





