शिंदेवाडीत घरफोडी; रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह ३ लाख ७० हजारांचा ऐवज लंपास
खेड शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावरील शिंदेवाडी(ता. भोर) येथील गोगलवाडी फाट्यावर अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत अमित विजय शिंदे (वय ३७, रा. शिंदेवाडी, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री ११.३० ते २९ सप्टेंबरच्या पहाटे ६ या वेळेत घडली. फिर्यादी अमित शिंदे हे घरी नसताना चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील पेटीत व बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेले. त्यामध्ये दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, ५० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांच्या ऐवजचा समावेश आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करत आहेत.





