मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी राजे फाऊंडेशनचा मदतीचा हात; “मिठापासून ताटापर्यंत” अभियान सुरू
राजगड : महाराष्ट्रातील मराठवाडा पाण्याखाली तडफडतो आहे. अतिवृष्टी व ढगफुटीने धाराशिव, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. गावोगाव घरे, संसार पाण्यात वाहून गेले आहेत; दरडीखाली कित्येक घरं व माणसं गाडली गेली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
या कठीण प्रसंगी “संकट काळात महाराष्ट्र एकदिलाने उभा राहतो” या परंपरेनुसार राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. फाऊंडेशनने “मिठापासून… ताटापर्यंत मदतीचा हात” या अभियानांतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत पोहोचविण्याचे ठरवले असून शिलेदार स्वतः घटनास्थळी जाऊन मदत साहित्य वाटणार आहेत.
मदतीसाठी आवश्यक साहित्य…
तांदूळ, कडधान्य, डाळी, तेल पॅकेट, खोबरेल तेल, तिखट-मसाले, मीठ, साखर, चहा पावडर, बिस्कीट, कपडे धुण्याचा व अंग धुण्याचा साबण, गव्हाचे पीठ, फरसाण, पाण्याच्या बाटल्या, ब्लँकेट, चादरी, टॉवेल, ताडपत्री, स्त्री-पुरुषांचे कपडे, भांडी (ताट, वाट्या, पेले), मेणबत्ती, टूथपेस्ट, टूथब्रश, फिनेल, औषधे, सॅनिटरी पॅड आदी वस्तूंची तातडीने गरज आहे.
राजे फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित पिसाळ यांनी आवाहन केले आहे की, ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य किंवा आर्थिक मदत करावी. अधिक माहितीसाठी ९८७०९६२७२७ या क्रमांकावर संपर्क करावा असे त्यांनी सांगितले.





