भोलावडेच्या व्यक्तीला खेड शिवापुरच्या बोळात लुटलं; सोनं-मोबाईल गायब, गुन्हा दाखल
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर गावच्या हद्दीतील कोंढणपुर पुलाखालील एका हॉटेलच्या बोळात मध्यरात्री ४ अज्ञात इसमांनी भोलावडे (ता. भोर) येथील व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून सुमारे ९१ हजार ७०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत सुनिल निवृत्ती चव्हाण (वय ५६ वर्ष) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल चव्हाण हे दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता गावातील हॉटेल कल्याण दरवाजा जवळील बोळात गेले असताना दोन मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली. लाथा-बुक्यांनी मारहाण करत गळ्यातील ८१ हजार ७०० रुपयांच्या किमतीची चैन व खिशातील १० हजार किमतीचा मोबाईल फोन असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) रोजी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत ४ अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील पुढील तपास करत आहेत.





