चेलाडी–राजगड रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
राजगड : प्रशासनाच्या बेफिकीरीची किंमत अखेर एका आईला आपल्या प्राणांनी चुकवावी लागली आहे. अस्कवडी (ता. राजगड) येथील भारती बाळू दसवडकर (वय ५३) या चेलाडी–वेल्हा रस्त्यावर खड्ड्यात दुचाकी घसरून गंभीर जखमी झाल्या होत्या. तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) रात्री मृत्यू झाला. ही घटना फक्त एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यासाठी हादरवणारी ठरली आहे. कारण या घटनेने पुन्हा एकदा “खड्ड्यांचा बळी” हा शब्द जिवंत केला आहे.
दसवडकर यांची मृत्युशी झुंज अखेर अपयशी…
११ सप्टेंबर रोजी भारती दसवडकर आपल्या मुलासोबत दुचाकीवरून अस्कवडीकडे जात असताना चेलाडी– राजगड(वेल्हा) रस्त्यावरील खोल खड्ड्यात दुचाकी अडकली. त्यात भारती दसवडकर या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर त्या २३ दिवसांपासून कोमात होत्या. अखेर उपचारांना यश न येता त्यांचा मृत्यू झाला.
जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी…
या घटनेनंतर भारती दसवडकर यांच्या मुलाने वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. “लाखो रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. खड्ड्यांमुळे माझ्या आईचा जीव गेला. जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे,”
असं तुषार दसवडकर यांनी संतप्तपणे सांगितलं.
पर्यटन रस्त्यांची दयनीय अवस्था…
राजगड, तोरणा, मढे घाट, भोर हे सर्व भाग पर्यटकांनी फुललेले असले तरी रस्त्यांची अवस्था मृत्यूचा सापळा बनली आहे. स्थानिक नागरिक वारंवार तक्रारी करत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत.
आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष…
“दरवर्षी कोणी तरी या रस्त्यांवर प्राण गमावतो. पण प्रशासन फक्त कागदावर काम दाखवतं. खड्डे फक्त रस्त्यात नाहीत, तर संपूर्ण प्रणालीत भरले आहेत,”
अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. भारती दसवडकर यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. आता वेल्हे पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जवाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





