भोर-कापूरहोळ रस्त्यावर थरार; भोरच्या माजी सभापतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
भोर : जुन्या भांडणाचा राग मनात धरत भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांनी थेट गाडी अंगावर घालून दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भोर- कापूरहोळ रस्त्यावर सांगवी गावच्या हद्दीत घडली. या प्रकरणी सचिन शिवाजी जांभुळकर (वय ४०, रा. येवली, ता. भोर) यांनी फिर्याद दिली असून भोर पोलिसांनी माजी सभापती अंकुश पांडुरंग खंडाळे (रा. येवली, ता. भोर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) दुपारी १२ च्या सुमारास जांभुळकर हे आपल्या पुतणी धनश्री शशीकांत जांभुळकर (वय ११) हिच्यासह इलेक्ट्रीक दुचाकीवरून हारतळी (ता. खंडाळा) येथे जात होते. सांगवी गावच्या हद्दीत आल्यानंतर कापूरहोळ दिशेकडून आलेल्या पांढऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत जांभुळकर आणि त्यांची पुतणी दोघेही गंभीर जखमी झाले. धनश्रीच्या पाय, टाच आणि हाताला गंभीर दुखापती झाल्या असून जांभुळकर यांच्या डोक्याला, हाताला आणि पाठीवर मार लागला आहे.
मागील वर्षी (२०२४) अंकुश खंडाळे आणि सचिन जांभुळकर यांच्यात वाद होऊन दोघांनीही एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्याच वादाचा राग मनात धरून खंडाळे यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून भोर पोलिसांनी कलम ३०७ अंतर्गत (खुनाचा प्रयत्न) गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण करत आहेत.





