राजगड तालुक्यातील २० शाळांना दिवाळी किट वाटप; गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक दिवाळी’चा संकल्प
राजगड : तालुका युवासेना उपाध्यक्ष मंगेश रेणुसे यांच्या पुढाकारातून एक सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिवाळी किट आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या वेळी युवासेना तालुकाध्यक्ष योगेश लिम्हण, शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चोरघे, माजी सभापती दत्ता देशमाने, दिनकर तात्या चोरघे, नीलेश चोरघे, संकेत सोंडकर, ओंकार कदम तसेच असंख्य शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मंगेश रेणुसे म्हणाले, “राजगड तालुक्यातील प्रत्येक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळावी, हीच आमची दिवाळीची खरी भेट आहे. शाळांना कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक अडचणी भासल्यास त्या दूर करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन.”
यावेळी शिक्षकांनी शाळेतील आवश्यक सुविधा व साहित्याबाबत मागणीपत्र रेणुसे यांना सादर केले. त्यांनी तात्काळ त्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले, यामुळे शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले. याचबरोबर, दिवाळी निमित्त राजगड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.





