भोर, राजगड, मुळशी बनणार भाजपाचा गड, माजी आमदार संग्राम थोपटे यांचा विजय संकल्प; भोरला नगरपरिषद इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

भोर : भोर, राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांतील मतदारांमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी वाढत असलेला विश्वास आणि विकासाच्या माध्यमातून निर्माण झालेली सकारात्मक लाट पाहता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला आहे.

भोर येथे नगरपरिषद इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन…
रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात नगरपरिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारांच्या मुलाखतींना इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
भोर नगरपरिषदेतील दहा प्रभागांतील २० नगरसेवक व एका नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींना इच्छुक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. मुलाखती भोर नगरपरिषद निवडणूक मुख्य प्रभारी राजेंद्र शिळीमकर, सहप्रभारी गिरीश जगताप, माजी आमदार संग्राम थोपटे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष धावले आणि रवींद्र कंक यांच्या उपस्थितीत पार पडल्या. नगरसेवक पदासाठी प्रत्येकी प्रभागातून दहा ते अकरा इच्छुक, तर नगराध्यक्ष पदासाठी गणेश पवार, संजय जगताप आणि गजानन दानवले यांनी मुलाखती दिल्या.

Advertisement

फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा विश्वास — संग्राम थोपटे…
यावेळी माजी आमदार थोपटे म्हणाले की, “भोर शहरासह ग्रामीण भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा दृढ विश्वास निर्माण झाला आहे. विकास कामांची गती आणि पारदर्शकता पाहता मतदार भाजपाकडे आकर्षित झाले आहेत. शहरातील माजी नगरसेवकांपैकी एक-दोन अपवाद वगळता सर्वांनी भाजपात प्रवेश केला आहे. राज्यात युतीचे आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने लोकांच्या मनात भाजपा विषयी आत्मविश्वास आणि स्थैर्य निर्माण झाले आहे.”

भोर, राजगड व मुळशीत भगवा झेंडा फडकवण्याचा आत्मविश्वास…
संग्राम थोपटे यांनी पुढे सांगितले की, “दिलेल्या वचनांची पूर्तता करणारा आणि विकासासाठी कटिबद्ध असलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजपा. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीत मतदार विरोधकांना योग्य उत्तर देतील आणि भोर, राजगड व मुळशीच्या पंचायत समित्या तसेच भोर नगरपरिषदेवर भाजपाचा भगवा झेंडा फडकेल.” असे यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page