भोंगवली गणात पंचवीस वर्षांची निष्ठा आता संधीच्या प्रतीक्षेत; विश्वाजीत जगतापांची उमेदवारीची मागणी
सारोळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान, क्रियाशील आणि सक्रिय नेतृत्व भोर तालुक्याच्या पूर्व भागातील न्हावी येथील विश्वाजीत उर्फ धनंजय सूर्यकांत जगताप यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी भोंगवली गणातून उमेदवारीची मागणी केली आहे. विश्वाजीत जगताप हे गेली पंचवीस वर्षे पक्षाच्या विचारधारेतून कार्यरत असून, सामाजिक व विकासात्मक कामांद्वारे पक्षाचा झेंडा तळागाळात पोहोचविण्याचे सातत्याने काम त्यांनी केले आहे.
२००७ पासूनची सातत्यपूर्ण पक्षनिष्ठा…
सन २००७ पासून पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारीची इच्छा व्यक्त करत त्यांनी पक्ष निष्ठेने जोपासला. त्यावेळी पक्षाने इतर उमेदवारांना संधी दिली असली, तरी त्यांनी एकनिष्ठपणे कार्य सुरू ठेवले. २०१२ साली त्यांच्या पत्नी तृप्ती जगताप यांच्या नावाने उमेदवारीची मागणी केली असता देखील पक्षाने अन्य कार्यकर्त्यांना संधी दिली; तरीही त्यांनी कार्यात सातत्य राखले.
२०१७ मध्येही उमेदवारीची मागणी; तरीही निष्ठा कायम…
यानंतर २०१७ साली भोंगवली गणातून उमेदवारीची मागणी केली असता, जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही पातळ्यांवर इतरांना उमेदवारी देण्यात आली. त्या काळात त्यांचे चुलते भालचंद्र जगताप यांनी पक्षातील जबाबदाऱ्या सांभाळत धनंजय जगताप यांना पक्षाचे काम मनापासून करण्यास सांगितले. त्यांनी त्या सूचनेचे पालन करत न थकता पक्षाच्या प्रत्येक अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
पंचवीस वर्षांच्या कार्याचा सन्मान व्हावा – विश्वजीत जगताप…
विश्वजीत जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गेल्या पंचवीस वर्षांच्या पक्षसेवा, जनसंपर्क आणि सामाजिक कार्याच्या जोरावर मी ही उमेदवारी मागत आहे. माझ्या उमेदवारीमुळे जिल्हा परिषद सदस्य उमेदवारांना नक्कीच फायदा होईल, आणि आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी विजय मिळवू शकतो, याची मला शंभर टक्के खात्री आहे.”
आता पक्षाने माझ्या निष्ठेचा सन्मान करावा…
पुढे प्रतिक्रिया देताना जगताप म्हणाले की, “मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सदैव पक्षाच्या आदेशाचे पालन केले आहे. आता माझ्या कार्याचा आणि निष्ठेचा विचार करून पक्षाने मला संधी द्यावी, ही माझी आणि माझ्या मित्रपरिवाराची विनंती आहे.” असे त्यांनी सांगितले.





