भोर नगरपरिषदेच्या रणसंग्रामाला सुरुवात; पहिल्या दिवसाची शांत सुरुवात, पुढे माहोल तापणार
भोर : भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) अर्ज निरंक राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे यांनी दिली. या निवडणुकीत १० प्रभागांमधील २० नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत नामनिर्देशन पत्रे १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषद सभागृहातील निवडणूक कक्षात स्वीकारली जातील. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रांची निश्चिती केली जाईल. तसेच अपील प्रक्रिया २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार आहे.
निवडणुकीसाठी नगरपरिषद क्षेत्रातील ८ इमारतींमध्ये एकूण २२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २५० ते ३०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले असून ८ तपासणी पथकांची (व्हीएसटी, एफएसटी, एसएसटी, व्हीव्हीएसटी) नेमणूक करण्यात आली आहे.
दहा प्रभागांमधून निवडल्या जाणाऱ्या २० नगरसेवकांसह एका नगराध्यक्ष पदासाठी एकूण १६ हजार ७१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भोरवासीयांनी लोकशाहीचा पाया भक्कम आणि सुदृढ करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे उपस्थित होते.





