दिडघरमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; दोन घरे जळून खाक, नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्याची ग्रामस्थांची मागणी

नसरापूर : दिडघर (ता. भोर) येथे मंगळवारी सकाळी झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीत एकाच वाड्यातील शेजारील दोन घरे पूर्णतः जळून खाक झाली. अचानक झालेल्या स्फोटाने परिसर दणाणून गेला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत घरांतील सर्व जीवनावश्यक साहित्य, धान्यसाठा, कपडे, रोकड तसेच साडेपाच तोळे सोन्यासह अंदाजे दहा लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे.

दोन घरांचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली…
यमुना रघुनाथ बांदल व दिनेश काशिनाथ बांदल यांची या आगीत लाकडी तुळई व कौलारु बांधकामाची घरे पूर्णपणे भस्मसात झाली. स्फोटाच्या वेळी यमुनाबाई या शेतावर गेल्याने कोणतीही जीवितहानी टळली. तर दिनेश बांदल यांना ग्रामस्थांनी तातडीने सतर्क करीत सुरक्षित स्थळी हलवले.

Advertisement

ग्रामस्थांची धावपळ व अग्निशमन दलाची मदत…
स्फोटाचा आवाज होताच स्थानिक ग्रामस्थ धावून आले. अग्निशमन दल येईपर्यंत ग्रामस्थांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा प्रचंड भडका पाहता परिस्थिती हाताबाहेर जात होती. सामाजिक कार्यकर्ते सचिन बांदल यांनी तात्काळ पीएमआरडीए व भोर नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रांना संपर्क साधला. काही वेळात पीएमआरडीएच्या दोन अग्निशमन गाड्या दाखल झाल्या आणि तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीची तीव्रता इतकी होती की आसपासच्या अन्य कौलारू घरांनाही धग लागण्याचा धोका निर्माण झाला होता.

महसूल अधिकाऱ्यांची पाहणी व पंचनामा…
घटनास्थळी महसूल मंडलाधिकारी प्रदिप जावळे, ग्राममहसूल अधिकारी सचिन ढोरे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी सरला नलावडे यांनी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. महसूल अधिकारी ढोरे यांनी पंचनामा करताना घरातील धान्यसाठा, फर्निचर, छप्पर, सागवान लाकूड, कपडे, रोकड व सोने यांसह संपूर्ण मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची नोंद केली.

नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीची गरज…
दरम्यान, या दोन्ही कुटुंबांची घरे पूर्णपणे नष्ट झाल्याने ते बेघर झाले असून शासनाने तात्काळ मदत करावी, तसेच नागरिकांनीही पुढे येऊन सहाय्य करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page