केदारेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास; विकासकामांच्या जोरावर शिरवळ गटात उदय कबुले केंद्रस्थानी
शिरवळ : साताऱ्यातील शिरवळ जिल्हा परिषद गटात सध्या एका नावाची सातत्याने चर्चा होत आहे. ते नाव म्हणजे मंत्री मकरंद पाटील यांचे एकनिष्ठ म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले. राजकारण म्हणजे केवळ सत्तास्पर्धा नसून, जनतेशी नातं जोडण्याची आणि विश्वास टिकवण्याची प्रक्रिया असते, हे उदय कबुले यांनी आपल्या संपूर्ण राजकीय प्रवासातून प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. जिथे निवडणूक काळात घोषणांचा गाजावाजा असतो, तिथे उदय कबुले यांचे राजकारण मात्र काम, परिणाम आणि लोकांच्या समाधानावर उभे असल्याचे चित्र दिसते.
घराणेशाही नव्हे, संघर्षातून घडलेले नेतृत्व…
उदय कबुले यांचा राजकीय प्रवास कुठल्याही घराणेशाहीचा किंवा अचानक मिळालेल्या संधीचा नाही. केदारेश्वर तरुण मंडळाचा साधा कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला हा प्रवास ग्रामपंचायत उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि पुढे जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे प्रशासनाची कार्यपद्धती, गावागावातील वास्तव समस्या आणि विकास निधीचा योग्य वापर कसा करायचा, याची त्यांना अनुभवातून आलेली सखोल जाण आहे.
शिरवळ गावापासून सुरू झालेला प्रवास…
शिरवळ गावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज संपूर्ण शिरवळ गटाच्या विकासाचा चेहरा बदलणारा ठरला आहे. तरुण मंडळातील सामान्य कार्यकर्ता ते सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतचा हा प्रवास केवळ पदांचा नसून, संघर्ष, सातत्य, लोकांचा विश्वास आणि ठोस कामाचा आहे. गेल्या जिल्हा परिषद कार्यकाळात शिरवळ गटातील २३ गावांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, सामाजिक सभागृह, अंतर्गत गटार योजना अशा मूलभूत विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
विकासाला प्रथम प्राधान्य…
महत्त्वाचे म्हणजे उदय कबुले यांनी विकासाला कधीही राजकीय रंग दिला नाही. पक्ष, जात-धर्म यापेक्षा “तो शिरवळ गटाचा नागरिक आहे” हेच त्यांचे मुख्य सूत्र राहिले. त्यामुळे महिला बचत गट, तरुण उद्योजक, शेतकरी, कष्टकरी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांमध्ये त्यांची विश्वासार्ह व स्वीकारार्ह अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सर्वसामान्यांशी असलेली थेट नाळ; उदय कबुले यांची खरी ताकद…
सर्वसामान्यांशी असलेली थेट नाळ ही उदय कबुले यांची मोठी ताकद मानली जाते. सामान्य कार्यकर्त्यापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिलांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळेच सर्व स्तरांतून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसतो. आज शिरवळ गटाच्या निवडणुकीत अनेक चेहरे रिंगणात असले, तरी अनुभव, कामाची शाश्वती आणि नेतृत्वाची परिपक्वता या त्रिसूत्रीवर उदय कबुले इतरांपेक्षा वेगळे ठरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.





