कामथडी गावाची विकासासाठी एकजूट; निता इंगुळकर यांच्या विजयाचा ग्रामस्थांचा निर्धार
कापूरव्होळ : कामथडी पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आलेल्या निता धनंजय इंगुळकर यांची कामथडी(ता. भोर) गावाने सर्वानुमते अधिकृत उमेदवार म्हणून निवड करत एकजूट आणि विकासाचा ठोस संदेश दिला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत ग्रामस्थांनी “गाव प्रथम” ही भूमिका घेत एकाच उमेदवारामागे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
गावातील सभेत महिला, तरुण, प्रौढ, शेतकरी, व्यापारी, कामगार अशा सर्व स्तरांतील नागरिकांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवित शंभर टक्के मतदानाचा निर्धार केला. “एक गाव, एक नेतृत्व आणि एक विकासदिशा” या संकल्पनेतून गावातील प्रत्येक घरातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कामथडी गणात विक्रमी मतदान घडवून आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
निता इंगुळकर व त्यांचे पती धनंजय इंगुळकर हे सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या आणि गावपातळीवरील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पाणी, रस्ते, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, शेतकऱ्यांसाठी सुविधा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या मुद्द्यांवर काम करण्याची त्यांची स्पष्ट भूमिका ग्रामस्थांना भावली. त्यामुळेच गावाने पक्षनिष्ठेपेक्षा कार्यनिष्ठेला प्राधान्य देत त्यांच्यावर एकमताने विश्वास टाकला.
कामथडी गावातील ही एकजूट केवळ निवडणुकीपुरती नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक नेतृत्व उभे करण्याची सुरुवात असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. आता संपूर्ण गणाचे लक्ष या एकमताच्या शक्तीकडे लागले असून, निता धनंजय इंगुळकर यांच्या उमेदवारीमुळे कामथडी गणात राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.





