नसरापूर गणात मशालीची एंट्री; सचिन बांदल यांचा शिवसेना उ.बा.ठा. पक्षात प्रवेश
नसरापूर : भोर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडली असून, कुलदीप कोंडे यांचे कट्टर समर्थक व हॉटेल राजतोरण मिसळचे सर्वेसर्वा म्हणून ओळख असलेले सचिन बांदल यांनी शिवसेना (शिंदे गट) सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. गावकरी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे नसरापूर–वेळू जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. शिवसेना उ.बा.ठा.चे संघटक ज्ञानेश्वर माऊली शिंदे आणि युवासेना तालुका प्रमुख अनिकेत शिंदे तसेच महेंद्र भोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदल यांचा पक्षप्रवेश पार पडला. बांदल यांची स्थानिक पातळीवरील मजबूत संघटना, युवकांमध्ये असलेला प्रभाव आणि सामाजिक कार्यामुळे हा प्रवेश उ.बा.ठा.साठी महत्त्वाचा मानला जात आहे.
सचिन बांदल हे नसरापूर परिसरात व्यावसायिकासोबतच सामाजिक भुमिकेमुळे परिचित आहेत. स्थानिक स्तरावर तरुणांना एकत्र करून विविध उपक्रम राबवणे, गावातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि मतदारांमध्ये सक्रिय संपर्क राखणे या त्यांच्या शैलीमुळे त्यांना स्वतंत्र ओळख मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा पक्षबदल हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून स्थानिक राजकारणात मोठा संदेश मानला जात आहे.
या प्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) ला नसरापूर भागात मोठा धक्का बसल्याची चर्चा असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उ.बा.ठा.ची ताकद लक्षणीय वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. बांदल यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवर नवीन गटबांधणीला वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नसरापूर–वेळू गटात आधीच चुरशीचे वातावरण असताना बांदल यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पुढील काळात याचे राजकीय परिणाम दूरगामी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.





