शिवापूरची तन्वी शिंदे ठरली राष्ट्रीय पॅरा-पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन; सुवर्णपदकाने गौरव
खेड शिवापूर : उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा-पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवगंगा खोऱ्यात असलेल्या शिवापूर(ता. हवेली) गावची सुकन्या तन्वी निलेश शिंदे हिने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत तन्वीने हे यश संपादन करून महाराष्ट्र राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
तन्वी शिंदे हिने यापूर्वी पॅरा-पॉवरलिफ्टिंगसह क्रिकेट या खेळातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत असून, त्याचबरोबर ‘यूपीएससी’ परीक्षेची तयारीही करत आहे. अभ्यासासोबतच खेळाची आवड जपत ती नियमित सराव करते, हे तिच्या यशाचे गमक ठरले आहे.
लहानपणी झालेल्या रस्ते अपघातात तन्वीच्या पायाला अपंगत्व आले; मात्र तिने खचून न जाता जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नवे शिखर गाठले. या प्रवासात तिला सदैव खंबीर पाठिंबा देणारी मोठी बहीण रसिका शिंदे हिचा मोलाचा वाटा आहे. या यशामागे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रमेश सरतापे, सारिका सरनाईक व राकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच महाबली फिटनेस क्लब, कोंढणपूर फाटा येथे गेल्या दोन वर्षांपासून अतिश कांबळे व देव शर्मा यांनी दिलेल्या सखोल प्रशिक्षणामुळे तन्वीच्या कामगिरीला बळ मिळाले. तन्वीच्या या यशाबद्दल दोन्ही बहिणींसह आई-वडिलांचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे तन्वीचे स्वप्न लवकरच साकार होवो, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





