पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक; साडेपाच लाखांचे सोनं लंपास, ससेवाडीतील घटना
खेड शिवापूर : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धाची फसवणूक करत तब्बल ५ लाख ५८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना पुणे- सातारा महामार्गावरील ससेवाडी (ता. भोर) येथे घडली. याबाबत बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ (वय ६५, रा. उत्तमनगर, एनडीए रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धुमाळ हे मंगळवारी (दि. २३ फेब्रुवारी) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ससेवाडी येथील केंब अँड टॉर कंपनीसमोरील कच्च्या रस्त्यालगत मोटारसायकल लावून लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत परिसरात तपासणी सुरू असल्याची बतावणी केली.
त्यानंतर अंगावरील दागिने काढून कापडात बांधून खिशात ठेवण्यास सांगितल्याने धुमाळ यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ८ तोळे ९०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची चैन (अंदाजे किंमत ४ लाख ५९ हजार १७० रुपये) तसेच २ तोळे २०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत ९९ हजार रुपये) त्या इसमाकडे दिली. आरोपीने दागिने कापडात बांधल्याचा बनाव करून ते स्वतःकडेच ठेवले आणि तेथून पसार झाला. या प्रकारात एकूण ५ लाख ५८ हजार १७० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले असून राजगड पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रधान करीत आहेत.





