भोर पंचायत समितीत ‘चार विरुद्ध चार’चा खेळ; भोरचा सभापती चिट्ठीवर ठरणार की ‘गैरहजेरीच्या गेम’वर? वरून शांतता, आतून खलबतं
भोर : नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर भोरमध्ये सत्ता स्थापनेपेक्षा सदस्य सांभाळण्याचीच जास्त धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. चार-चार जागांवर अडकलेल्या समीकरणामुळे सभापतीपदाची निवड आता धोरणांपेक्षा नशीब, चिट्ठी किंवा ‘कोणाचा मेंबर कोण पळवणार?’ यावर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२० मार्चपूर्वी निवड; भोरचे राजकारण तापले…
राज्याच्या ग्रामविकास विभागाने २० मार्च २०२६ पूर्वी अध्यक्ष व सभापती निवडण्याचे आदेश दिल्यानंतर भोरमधील राजकारण अचानक तापले आहे. मात्र विकासाच्या चर्चा बाजूला पडून “कोणाचा सदस्य कुठे गेला?” हा प्रश्नच दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. काही सदस्य तर फोनवर सतत उपलब्ध राहावेत म्हणून नेत्यांनी खास ‘नजर ठेव मोहीम’च सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
चार-चार जागांमुळे चिट्ठीवर सत्ता?..
चार जागा भाजप आणि चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने स्पष्ट बहुमत कुणालाही नाही. त्यामुळे सभापती निवड चिट्ठीद्वारे होण्याची शक्यता पुढे आली आहे. भोरमध्ये आता परिस्थिती अशी झाली आहे की मतदारांनी मतदान केले असले तरी अंतिम निकाल ‘देवाच्या किंवा चिट्ठीच्या भरोशावर’ लागण्याची वेळ आली आहे, अशी उपरोधिक चर्चा गावोगावी सुरू आहे.
‘एक सदस्य गैरहजर’ हीच नवी रणनीती?..
दरम्यान, राजकीय वर्तुळात आणखी एक धक्कादायक चर्चा रंगली आहे. “कितीही पैसे गेले तरी चालतील, पण विरोधी गटातील एक सदस्य गळाला लागून मतदानाच्या दिवशी गैरहजर राहिला तर सत्ता आपली” असा विचार काही इच्छुकांनी सुरू केल्याची चर्चा आहे. म्हणजे सभापती होण्यासाठी मतदारांचा नव्हे तर “एका सदस्याच्या गैरहजेरीचा आशीर्वाद” मिळवण्याचीच चढाओढ सुरू असल्याचे बोलले जात आहे. सभापती निवडीला अजून काही आठवड्यांचा अवधी असला तरी राजकीय गणितापेक्षा ‘सदस्य कुणाकडे राहणार’ हेच मोठे समीकरण ठरले आहे.
वरून शांतता, आतून खलबतं…
दरम्यान, वरून सगळे म्हणतायत “आम्ही कुणाच्या सोबत नाही”, पण आतून मात्र जोरदार खलबतं सुरू असल्याचं बोललं जातंय. भोरमध्ये सध्या एकच विषय जोरात आहे , “सभापती कोण होणार आणि कोणाचा मेंबर कोण पळवणार?” आता २० मार्चपूर्वी होणाऱ्या पहिल्या बैठकीत भोर पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार, चिट्ठीच सत्ता ठरवणार की एखादा सदस्य अचानक ‘गायब’ होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





