उद्योजक लखन दळवी यांच्या मुलाचे कापूरव्होळ येथून अपहरण; ग्राम सुरक्षा यंत्रणा व पोलिसांच्या मदतीने काही तासात लावला शोध

कापूरव्होळ : ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे व पोलीस प्रशासनामुळे अपहरण झालेला १८ वर्षीय युवक अवघ्या काही तासात शोधण्यात पुणे– सातारा पोलिसांना यश आले. या घटनेमुळे ग्राम सुरक्षा यंत्रणेची परिणामकारकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

कापूरव्होळ येथून मुलाचे धाडसी अपहरण…
मंगळवारी (दि. ३ मार्च) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कापूरव्होळ (ता. भोर) येथील उद्योजक लखन दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी (वय १८) हा कापूरव्होळ येथील पुलाजवळून घरी जेवण्यासाठी जात असताना ३ ते ४ अज्ञात व्यक्तींनी काळ्या रंगाच्या एक्सयूवी ७०० कारमधून (एम.एच. १२ एक्स.इ ५३५३) त्याचे अपहरण केले.

कापूरव्होळ– वीर– मांडकी मार्गे अपहरणकर्त्यांची पळवाट…
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अपहरणकर्ते कापूरव्होळ– सारोळा– वीर– मांडकी मार्गे पळून गेले. त्यानंतर लखन दळवी यांनी तात्काळ पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र अपहरणकर्ते पसार झाले. घाबरलेल्या अवस्थेत ते शिरवळ पोलीस ठाण्यात पोहोचले.

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या कॉलने हलली संपूर्ण यंत्रणा…
दरम्यान, लखन दळवी यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 18002703600 वर कॉल करून माहिती दिल्यानंतर पुणे व सातारा जिल्ह्यातील अनेक गावे आणि पोलीस ठाण्यांना तात्काळ संदेश पोहोचला. त्यानंतर राजगड, खंडाळा, जेजुरी, सासवड, शिरवळ, लोणंद, भुईंज, फलटण ग्रामीण तसेच महामार्ग पोलीस व ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. गावोगावी नाकाबंदी करण्यात आली.

Advertisement

मांडकीजवळ युवकाची सुखरूप सुटका…
काही तासाच्या शोधमोहीमनंतर मांडकी (ता. पुरंदर) गावाजवळ अपहरणकर्त्यांनी गाडी व पृथ्वीराज दळवी याला सोडून पलायन केले. युवक सुखरूप सापडल्याने पोलीस, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कापूरव्होळ ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य, अधिकारी आणि पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात असून आतापर्यंत विविध सूचनांसाठी या यंत्रणेचा १२ वेळा वापर करण्यात आला आहे.

लाखो नागरिक जोडले गेले ग्राम सुरक्षा यंत्रणेशी…
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे ११९६ गावे सहभागी असून ११.२५ लाख नागरिक जोडले गेले आहेत. आतापर्यंत या यंत्रणेचा ३५,४८० वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे. संकटकाळात नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 18002703600 किंवा 9822112281 वर संपर्क साधल्यास संबंधित व्यक्तीचा संदेश कॉल स्वरूपात गावातील नागरिकांना तत्काळ ऐकवला जातो. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page