हातवे-तांभाड रस्त्यावर काळाचा घाला; भरधाव डंपरच्या धडकेत आजोबा-नातीचा मृत्यू

नसरापूर : भोर तालुक्यातील हातवे-तांभाड रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील आजोबा आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे तांभाड गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात शिवाजी नामदेव शिळीमकर (वय ६९) व त्यांची नात तन्वी नितीन शिळीमकर (वय ९, सध्या रा. पुणे, मुळगाव तांभाड ता. भोर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १४) सकाळी शिवाजी शिळीमकर हे त्यांची नात तन्वी हिला घेऊन दुचाकी (एम.एच. २८ ए.डी. ३१३६) वरून तांभाड गावाकडे जात होते. हातवे-तांभाड रस्त्यावर देऊळवाडी (हातवे) गावच्या हद्दीत त्यांच्या मागून येणाऱ्या भरधाव डंपरने (एम.एच. १४ एच.यू. ३७७७) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजोबा व नात गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी सुधाकर वसंत शिळीमकर (वय ५२, रा. नसरापूर, मुळगाव तांभाड) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भरधाव डंपर चालवून अपघात घडवून आणल्याप्रकरणी डंपर चालक आकाश शिवाजी भुसने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page