दोन मिनिटांचा संवाद, ११ हजारांचा डाव! नसरापूरमध्ये ‘भूल पाडून’ ज्येष्ठ शेतकऱ्याची लूट

नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, दोन अज्ञातांनी भूल पाडून एका ज्येष्ठ शेतकऱ्याची तब्बल ११ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तुकाराम रघुनाथ झोरे (वय ७५, रा. नसरापूर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास झोरे हे सांगवी-माळेगाव रस्त्याने शेतातून घराकडे परतत होते. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. “शंभराच्या नोटा देतो, पाचशेची नोट द्या,” असा बहाणा करत त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी झोरे यांना गोंधळात टाकत व भूल पाडल्यासारखी परिस्थिती निर्माण करून त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतली आणि काही क्षणातच दुचाकीवरून पसार झाले.

Advertisement

घटनेनंतर काही वेळाने झोरे यांच्या लक्षात आले की त्यांच्या खिशातील ११ हजार रुपये गायब झाले आहेत. यानंतर त्यांनी तत्काळ राजगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, ही संपूर्ण घटना नसरापूर ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपींचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार औदुंबर अडवाल करत असून, “अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page