भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

भोर : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सरपंच आणि सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये ९ सरपंच आणि ३४ सदस्य अशा एकूण ४३ जागांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

थेट सरपंच पदासाठी आपटी, करंदी खुर्द, कोळवडी, खडकी, प-हर बुद्रुक, रावडी, शिरवली, सोनवडी, वाढाणे या ९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार असून, अंगसुळे, आंबेघर, आपटी, करंजे, करंदी खु., कांबरे खे.बा., कासुर्डी गु.मा., कुंबळे, कोर्ले, कोळवडी, खडकी, तेलवडी, प-हर बु., बसरापुर, म्हाकोशी, रावडी, वडतुंबी, वाढाणे, वारवंड, शिरगांव, शिरवली, सांगवी, सांगवी बु., सांगवी हि.मा., साळव आणि सोनवडी या ग्रामपंचायतीच्या ३४ सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, तहसीलदार राजेंद्र नजन व निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी दिली.

Advertisement

तालुक्यातील या ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधींचे निधन, राजीनामा किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. प्रशासनाने आता या जागा भरण्यासाठी कंबर कसली असून, २८ एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

२९ एप्रिलला होणार मतमोजणी…
ही ग्रामपंचायत पोटनिवडणूक (२०२६) एप्रिल महिन्यात होणार असून सोमवारी (दि. ३० मार्च) भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांच्याकडून याबाबत नोटीस जाहीर होणार आहे. ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र सादर करावयाचे आहे. १५ एप्रिलला ११ वाजल्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. १७ एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत असणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे. २८ एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी २९ एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page