हॉटेलच्या सावलीत रक्तरंजित थरार! भोर तालुक्यातील जांभळी येथे वृद्धाचा निर्घृण खून; राजगड पोलिसांचा तपास सुरू
नसरापूर : नसरापूर-राजगड रोडवरील जांभळी (ता. भोर) गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये एक अत्यंत धक्कादायक व गंभीर स्वरूपाची घटना उघडकीस आली आहे. हॉटेल शेजारी टपरी चालवणारे किसन बाप्पु सुर्वे (वय अंदाजे ७९, सध्या रा. जांभळी, मूळ रा. भोंगवली ता. भोर) यांचा हॉटेलमधील आचारीने निर्घृण खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत किसन सुर्वे हे अनेक वर्षांपासून त्यांच्या जावई अनिल रसाळ यांच्या हॉटेल शेजारील टपरी चालवत होते. रोजच्या सवयीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर ते हॉटेलमध्येच झोपत असत. मंगळवार (दि. २४ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात कारणावरून हॉटेलमधील आचारीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्वनियोजित होती का, की वादातून घडली, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे जांभळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.





