मोबाईलच्या हट्टाने घेतला जीव, जांभळीतील खूनप्रकरणाचा ६ तासांत उलगडा; नेपाळला पळण्याआधी आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
नसरापूर : भोर तालुक्यातील जांभळी येथे हॉटेल परिसरात घडलेल्या खूनप्रकरणाचा राजगड पोलिसांनी अवघ्या ६ तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. सागर लक्ष्मण कुमार राणा (वय २०, मूळ रा. पाटण, जिल्हा बैतडी, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी हॉटेल मालक अनिल सखाराम रसाळ (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोबाईल न घेऊन दिल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपीने हॉटेल मालकाचे सासरे किसन बाप्पु सुर्वे (वय ७५, सध्या रा. जांभळी, मूळ रा. भोंगवली, ता. भोर) यांचा गंभीर खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी वेगाने सूत्र फिरवत तपास सुरू केला. या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी कात्रज चौकात थांबून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत आहे. यानंतर गवळी यांनी दोन विशेष पथके तात्काळ रवाना केली. पोलिसांनी अचूक सापळा रचत आरोपीला कात्रज चौकातून ताब्यात घेतले. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे अवघ्या काही तासांतच खूनप्रकरणाचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार मदने, निबांळकर तसेच पोलीस अंमलदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, समीर भालेराव, राहुल भडाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजगड पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करत आहेत.





