वरंधा घाट रस्ता ३० एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद; रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
भोर : महाड–भोर–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक समजला जाणारा वरंधा घाट रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव २५ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला असून, ही माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.
घाटातील हिर्डोशी ते वरंधा (कि.मी. 70/900 ते 92/003) या सुमारे 21 किलोमीटर अंतरावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हा परिसर दरडप्रवण असून घाटामध्ये अनेक ठिकाणी तीव्र व धोकादायक वळणे आहेत. आतापर्यंत सुमारे साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी खबरदारी घ्यावी आणि प्रवासाचे नियोजन बदलावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





