सहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) पुणे ग्रामीण यांनी उत्कृष्ट समन्वय आणि गुप्त माहितीच्या आधारे तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून मोठे यश संपादन केले आहे. दि. २७ मार्च रोजी हवेली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कुलदिप हरिओम वाल्मिकी (वय ३२, रा. उत्तम नगर, एनडीए रोड, पुणे) हा आगळंबे फाटा येथे थांबलेला आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Advertisement

सखोल चौकशीदरम्यान आरोपी हा राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातून फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे, सदर आरोपीवर यापूर्वीच तब्बल १८ गुन्हे तसेच २ मोक्का अंतर्गत कारवाया दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, हवालदार सागर नामदास, अमोल शेडगे, मंगेश भगत आणि तुषार भोईटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page