भोर येथे उभारणार शंभूराजेंचा अश्वारूढ पुतळा तर रामबाग येथील जलतरण तलावाला “राजमाता जिजाऊं”चे नाव
भोर : नगरपालिकेच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एसटी स्टँड परिसरातील नव्या व्यापारी संकुलाला “श्री छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल” असे नामकरण करून तेथे छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच रामबाग परिसरातील नव्या जलतरण तलावाला “राजमाता जिजाऊ जलतरण तलाव” असे नाव देण्यासही सभेत मंजुरी देण्यात आली. नगरपालिकेच्या नवीन कार्यकारिणीच्या या बैठकीत उपनगराध्यक्षा ॲड. जयश्री शिंदे व भाजपचे गटनेते अमित सागळे यांनी माहिती दिली. नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेला मुख्याधिकारी गजानन शिंदे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत चर्चेसाठी ठेवलेल्या ३२ ठरावांपैकी बहुसंख्य ठराव मंजूर करण्यात आले.
सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांमध्ये भोर नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे, चौपाटी येथील शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण व लिफ्टची दुरुस्ती व क्षमता वाढवणे, शहरात बॅनर लावण्याची ठिकाणे निश्चित करणे व विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, भाजी मंडईत शेतमाल साठवणुकीची व्यवस्था, नगरपालिका हद्दीतील दफनभूमी व मंदिरांवरील कर रद्द करणे, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळाला तोटी न लावणाऱ्यांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकासकामे सुचवण्याबाबतचा ठराव मांडण्यात आला. मात्र या ठरावाला भाजपकडून विरोध करण्यात आला. संबंधित प्रभागाचे नाव व कामाचे स्वरूप स्पष्टपणे नमूद करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, नगरपालिकेच्या सभांचे यूट्यूब चॅनलमार्फत थेट प्रक्षेपण करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मांडण्यात आला होता. मात्र भाजप सदस्यांनी विरोध केल्याने हा ठराव १५ विरुद्ध ३ मतांनी नामंजूर करण्यात आला.





