संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी; राजगड पोलीस ठाण्यात कारचालका विरोधात गुन्हा दाखल
भोर : तालुक्यातील संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर रविवारी (दि. २९ मार्च) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. राजेश दशरथ राठोड (वय २१, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड, पुणे) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत राज संजय हिंगमिरे (वय २०) याने फिर्याद दिली असून राजगड पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेश राठोड हा आपल्या मोटारसायकल (एम.एच. १२ यू.ई. ९२८७) वरून मित्र स्पंदन प्रविण बागुल याला घेऊन संगमनेर ते नऱ्हे मार्गाने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या कार (एम.एच. ०३ डी.यू. ७१६१) चालक राहुल उत्तम गोळे (रा. नऱ्हे, ता. भोर) याने वाहन भरधाव वेगाने चालवून मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या अपघातात राजेश राठोड याच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तर स्पंदन बागुल याच्या पाय, पोट व डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार नाना मदने करत आहेत.





