पहाटेची अचूक टिप; खेड शिवापूर टोलनाक्यावर प्रतिबंधित गुटख्यासहित ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड शिवापूर : राजगड पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत खेड शिवापूर टोलनाका येथे रविवारी(दि. २९ मार्च) पहाटे साडेचारच्या सुमारास मोठा साठा जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गणपत गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चालक ओंकार प्रशांत पोवार (वय २६, रा. हातकंणगले, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक बोलेरो पिकअप मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करत आहे. त्यानुसार पोलिसांनी रविवारी पहाटे खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सापळा रचून संशयित पिकअप (एम.एच. ५१ सी. १०३७) ताब्यात घेतली.

Advertisement

तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ६६ पोत्यांमध्ये विविध प्रकारचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पानमसाला (हिरवा व जांभळा पॅक), व्ही-१ तंबाखू पॅकेट्स तसेच वाहनासह एकूण ३७ लाख ९ हजार ७६० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चालक ओंकार प्रशांत पोवार याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कारवाई पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पार पडली असून पुढील तपासात या प्रतिबंधित मालाच्या पुरवठादार व उत्पादकांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page