डिजिटल व्यवहार करताना सावध राहा; ‘चुकून पैसे आले’ म्हणत कोळवडीतील महिलेची १० हजारांची ऑनलाईन फसवणूक

नसरापूर : भोर तालुक्यातील कोळवडी येथे एका महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून, केवळ एका अनोळखी फोन कॉलवर विश्वास ठेवल्यामुळे १० हजार रुपयांचा फटका बसला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात वाढणाऱ्या डिजिटल व्यवहारांमध्ये सावधगिरीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराधा शाईनाथ पडवळ (रा. कोळवडी, ता. भोर, जि. पुणे) यांना २९ मार्च रोजी सकाळी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. “तुमच्या खात्यात आमचे पैसे चुकून जमा झाले आहेत” असे सांगत संबंधित व्यक्तीने विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट व्यवहाराचा स्क्रीनशॉट पाठवून पैसे परत पाठवण्यास सांगितले.

Advertisement

स्क्रीनशॉटमध्ये व्यवहार यशस्वी झाल्याचे दिसत असल्याने पडवळ यांनी विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. मात्र काही वेळातच त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये डेबिट झाल्याचे दिसून आले आणि खाते शून्य शिल्लक दाखवत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ राजगड पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलीसांनी ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपासासाठी सायबर पोलीस, पुणे ग्रामीण यांच्याकडे प्रकरण वर्ग केले आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, “चुकून पैसे आले” अशा कारणांवर विश्वास ठेवू नका तसेच कोणताही व्यवहार करण्यापूर्वी स्वतःचे खाते तपासा, ओटीपी, यूपीआय किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नका. संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सजग राहून व्यवहार करणे हीच काळाची गरज बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page