राजगड मध्ये वन्यजीव शिकारीवर मोठी कारवाई; भेकर शिकार प्रकरणी तिघे जेरबंद, मांस व हत्यारे जप्त

राजगड : आंबेगाव वनपरिमंडळातील वेल्हा वनपरिक्षेत्रांतर्गत राजगड तालुक्यातील रांजणे फाटा येथे भेकर (पिसोरी) या वन्यप्राण्याच्या शिकारीप्रकरणी वन विभागाने रविवारी (दि. २९) मोठी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींना सोमवारी (दि. ३०) न्यायालयात हजर केले असता २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोंडगाव येथील मारुती बबन दारवटकर तसेच निगडे मोसे येथील दत्तात्रय लक्ष्मण नलावडे आणि गोरख हनुमंत नलावडे यांचा समावेश आहे. आरोपींकडून भेकर या वन्यप्राण्याचे मांस तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

Advertisement

गुप्त माहितीनुसार संबंधित आरोपी रिक्षा (क्र. एमएच. १२ व्हीडब्ल्यू. ६३९४) मधून शिकारीसाठी येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार रांजणे फाटा येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनपाल व वनरक्षकांच्या पथकाने सहभाग घेतला.

या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित गुन्हा अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. दरम्यान, डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राजगड तालुक्यात वन्यजीव शिकारीच्या एकूण १४ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page