गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या इसमास कारमधील कोयत्यासह राजगड पोलिसांनी घेतले ताब्यात; निगडे येथील घटना
कापूरव्होळ: पुणे-सातारा महामार्गावरील निगडे (ता. भोर) गावच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास एका संशयास्पद इसमास राजगड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन विजय नरुटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास निगडे गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सर्व्हिस रोडजवळ एक इसम अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील के.एल. ४८ जी ४८३२ क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयता आढळून आला.
याबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांना संशय अधिक बळावला. त्याला जागीच पकडून चौकशी केली असता त्याने आपले नाव सेलवान सोलामुन (वय ३६, रा. चेटटीकुलम, जि. नागरकोइल, तमिळनाडू) असे सांगितले. सदर इसम हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेला असल्याचा संशय व्यक्त करत संबंधित वाहनाबाबतही चोरीचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार राहुल कोल्हे करत आहेत.





